- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Silver Polish at Home
चांदीच्या वस्तू चमकविण्याचे घरगुती उपाय
सोने,चांदी हे आपल्याला आकर्षित करणारे धातू आहे.सामान्य माणूस नोकरीच्या सुरवातीच्या पगारात चांदीच्या वस्तू खरेदीपासून सुरवात करतो मग सोन्याच्या खरेदीचे आयोजन करतो. हळूहळू चांदीच्या वस्तूंची घरातील संख्या वाढत जाते. बहुदा चांदीच्या या वस्तू आपण फक्त सण-समारंभास वापरतो. इतर वेळेस आपण या व्यवस्थित पॅक करुन ठेऊन देतो. का ? तर मुख्य कारण हे आहे की,चांदीच्या या वस्तू वातावरणात उघड्या राहिल्यास काळ्या पडतात.स्टीलच्या भांड्यांप्रमाणे चांदीची भांडी रोज घासू शकत नाही,कारण त्यांना स्क्रॅचेस येऊ शकतात, बेंड होऊ शकतात किंवा त्यांना कोचे येऊ शकतात. अशा काहीही अडचणी न येतां, चमकत्या चांदीची भांडी नेहमी वापरण्याचे सौख्य प्राप्त करण्यासाठी अगदी साधेसुधे उपाय आहेत. ते आपण पाहूयांत.
चांदी काळी का पडते ?
आजारी पडल्यावर औषध पाणी करण्यापेक्षा,आजार होवूच नये यासाठी काळजी घेणे आवश्यक असते.म्हणून चांदी काळी का पडते हे जाणून घेणे जरुरी आहे.चांदी काळी पाडणारा मु्ख्य घटक गंधक(सल्फर). जसे पाण्यामुळे लोखंड गंजते,तसेच गंधक मुळे चांदी काळी पडते. आपण प्रदूषित वातावरणात जीवन जगत आहोत.वातावरणातील सल्फरशी चांदीची रासायनिक क्रिया होत असते. त्यामुळे सल्फरचे ॲाक्साइडस् तयार होत असतात, जे काळ्या रंगाचे असतात.यामुळे चांदीच्या वस्तू काळ्या दिसू लागतात. समुद्रा नजीकचे दमट हवामान चांदीच्या ॲाक्सिडेशनच्या रासायनिक क्रियेस अधिक पोषक असते. यामुळे दमट हवामानात चांदी लवकर काळी पडते. याचे अगदी साधे उदाहरण आपण अनुभवलेले असू शकते. गळ्यातील चांदीची साखळी लवकर काळी पडते,पायातल्या पैंजण पेक्षा. कानातील चांदीच्या कुड्या लवकर काळ्या पडतात,चांदीच्या लोंबत्या कानातल्यापेक्षा. याचं कारण हे आहे की आपल्या शरीरातील घामामुळे जो दमटपणा निर्माण होतो, त्या दमटपणामुळे चांदीवरील रासायनिक क्रियेचा वेग वाढतो व या वस्तू लवकर काळ्या पडतात. यासाठी स्वत:ला वापरण्याचे चांदीचे दागिने खरेदी करणार असाल तर असेच दागिने खरेदी करावे की ज्यांचा शरीराच्या घामाशी संपर्क कमी येईल. चांदीची इतर भांडी जर आपण रेग्युलर वापरणार असेल तर कधीही ती भांडी साफ,स्वच्छ हातांनी हाताळावीत. स्वच्छ,साफ, कोरड्या जागेवर ठेवावीत. यांमुळे ती कमीत-कमी काळी पडतील.दमट हवामानात राहणाऱ्यांना मात्र चांदीची भांडी / दागिने वापरांत नसेल तेव्हा कापसांत किंवा साफ,कोरड्या कॅाटनच्या कापडात गुंडाळून ठेवणे जरूरी आहे.
चांदीची भांडी चमकविण्यापूर्वी, ती स्वच्छ धुऊन साफ केलेली असावीत.चांदीची जेवणाची भांडी असतील किंवा तेलाचे दिवे, समया असतील,तर ते प्रथम भांड्यांच्या साबण/जेल ने धुतलेले असावेत. भांड्यांवर अन्नाचे कण,तेलाचे डाग नसावेत.
चांदी चमकविण्याचे उपाय
चांदीचे दागिने व छोट्या वस्तूंसाठी
१) एक कप पाण्यात,एक चमचा(नाष्ट्यासाठी वापरतो तो) मिठ टाकावे हे पाणी उकळून घ्यावे.यांत छोट्या अर्ध्या लिंबाचा रस पिळावा. यामध्ये चांदीची वस्तू पाच मिनिटांपर्यंत ठेवावी,नंतर साध्या पाण्याने धुऊन,स्वच्छ कापडाने पुसून घ्यावी. ती वस्तू चमकायला लागेल. येथे एका वस्तूचे प्रमाण दिले आहे. तुमच्या जेवढ्या वस्तू आहेत त्या पाण्यात पूर्ण बुडतील, एवढे कप पाणी घ्यावे, त्या प्रमाणांत मीठ व लिंबु वाढवावे. गरज पडल्यास अधिक चमक येण्याकरीता टुथब्रशने साफ करावे. ब्रश मुळे स्क्रॅचेस येणार असतील तर ब्रश चा वापर टाळावा.
२) कपडे धुण्यासाठी वापरली जाणारी वॅाशिंग पावडर गरम पाण्यात टाकून त्यामध्ये चांदीच्या वस्तू १० ते ३० मिनिटे भिजत ठेवाव्या,वस्तूच्या काळेपणानुसार. नंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुऊन व्यवस्थित कोरड्या कराव्यात. — वस्तू बुडतील एवढे पाणी असावे व जरूरी इतक्या मापाचे भांडे असावे. फार मोठे किंवा लहान भांडे नसावे. एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा वॅाशिंग पावडर असावी.
३) दोन ग्लास गरम पाण्यात अर्धा कप सफेद विनेगार व दोन चमचा बेकिंग सोडा टाकावा. यामध्ये चांदीच्या वस्तू १० मिनिटे ते तासभर ठेवाव्या.नंतर स्वच्छ पाणी वापरुन धुऊन कोरड्या कराव्यात. वस्तूंप्रमाणे सर्व घटकांचे व वेळेचे प्रमाण असावे. वस्तू फार नाजूक असेल तर सर्व घटक व वेळ कमी ठेवावे,किंवा हा उपाय टाळावा. कारण यामध्ये चांदीची काही अंशी घट होत असते.ती अगदी नगण्य असली तरी दिर्घकाळाने महागात पडते.
चांदीची लहान-मोठी भांडी चमकविण्यासाठी उपाय
१) टुथपेस्ट ही सर्व घरांत उपलब्ध असणारी वस्तू आहे. चांदीच्या कोणत्याही वस्तूवर टुथपेस्टचा एक पातळ लेप लावावा. म्हणजे टुथपेस्ट ब्रश किंवा बोटावर घेऊन वस्तूवर एकसारखी,समान पसरावी. दहा-पंधरा मिनिटांत पेस्ट थोडी सुकून जाते. स्वच्छ मऊ कापडाने ती पेस्ट पुसून काढावी.लहान किंवा मोठ्या भांड्यांवर हा प्रयोग करता येईल. ते चमकायला लागतील. —- टुथपेस्ट ही सफेद असावी.
२) वरील प्रमाणे अगदी सेम प्रयोग टुथपेस्ट ऐवजी टोमॅटो केचअप वापरुन करता येतो.
३) टुथपेस्ट किंवा केचअप ऐवजी बेकींग सोडा(खायचा सोडा) वापरुन हाच प्रयोग करता येतो. बेकिंग सोडा पाण्यात मिसळून त्याची पेस्ट करावी व त्या पेस्ट चा लेप वस्तूवर लावावा.
४) सॅनिटायजरचा वापर करुनही चांदीच्या वस्तू चमकविता येतात.स्वच्छ कापडावर सॅनिटायजरचे दोन-चार थेंब घ्यावे व त्या कापडाने चांदीची वस्तू पुसावी. वस्तू चमकेल.
अधिक उत्तम उपाय
वर जेवढे उपाय सांगितले आहेत,त्यामुळे चांदीच्या वस्तू व भाड्यांना चमक येते. तरी ते अगदी नविन वाटत नाहीत. नवीन दिसण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. टुथब्रश ने घासावे लागते. ब्रशने वस्तूंवर स्क्रॅचेस येऊ शकतात.
वापरलेली चांदीची भांडी व दागिने अगदी अगदी नविन दिसण्यासाठी फार साधा-सोपा उपाय आहे. यासाठी सर्वात पहिले,भांडी स्वच्छ धुऊन - पुसून घ्यावीत. भाड्यांवर तेलकट-तुपकटपणा किंवा खरखटे नसावे. आपल्याला कोलगेट किंवा इतर कोणत्याही कंपनीची पांढरी टुथपावडर आवश्यक आहे. थोडीशी टुथपावडर एका स्वच्छ मऊ कापडावर घेऊन त्या कापडाने भांडयांना चोळणे.कापड शक्यतोवर सिल्क किंवा कॅाटन चे असावे. जरूरी पडल्यास भांड्यांवर थोडी-थोडी टुथपावडर शिंपडणे व कापडाने रगडणे. पुन्हा एका स्वच्छ कापडाने भांडी पुसून घेणे. या पद्धतीने चांदीचे दागिने किंवा भांडी अगदी नविन असल्या सारखी दिसू लागतात.
या लेखांत आपण घरच्याघरी चांदीची भांडी चमकविण्यासाठी काही सोपे उपाय पाहिले आहेत. चांदीची भांडी पॅालिश करुन आणण्यापेक्षा किंवा चांदीला कोणत्याही रसायनाने पॅालिश करण्यापेक्षा हे उपाय अधिक फायदेशीर आहेत. कोणत्याही केमिकलने चांदीला पॅालिश करताना चांदीचा काही अंश विरघळत असतो. प्रत्यक्षात हे प्रमाण कमी असले तरी नेहमी पॅालिश करण्यामुळे काही काळानंतर चांदीच्या वजनात घट झालेली दिसून येईल. सोने-चांदीला पॅालिश करुन आणणे म्हणजे पैसे देवून आपण आपलेच नुकसान करुन घेणे आहे.
असो,हा लेख आवडला असल्यास आपल्या paisevasool18 ब्लॅाग ला फॅालो करा. अधिक माहिती करीता “Paise Vasool” युट्यूब चॅनल पहा.
जय हिंद ! जय महाराष्ट्र ! !
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
या ब्लॅाग मध्ये संपूर्ण अभ्यासपूर्वक लेख लिहिलेले आहेत की ज्यामुळे कोणत्याही वस्तू विषयी विश्वासार्ह माहिती उपलब्ध होईल,तरीही काही कमतरता जरुर राहू शकतात. कृपया आपल्या सूचना व मार्गदर्शन स्वागतार्ह आहे. आपले विचार जरुर नोंदवा व ब्लॅागला फॅालो करा. जयहिंद ! जय महाराष्ट्र !!