Rukhwat : लग्नातील रुखवत बाबत संपूर्ण माहिती

लग्नातील रुखवत बाबत संपूर्ण माहिती 

रुखवत कशाला म्हणतात ? 

महाराष्ट्रात ,बहुसंख्य मराठी भाषिक कुटुंबांच्या विवाह सोहळ्यात रुखवत शब्द ऐकायला व पाहायला मिळतो. विवाहाच्या दिवशी , लग्नाच्या मंडपात , एका कोपऱ्यात , टेबलांवर किंवा पायऱ्या बनवून विविध वस्तू व्यवस्थित मांडून ठेवलेल्या असतात. या वस्तूंमध्ये गृह सजावटीच्या वस्तू ,गृहोपयोगी वस्तू ,काही खाद्य पदार्थ  व बरेच काही आकर्षक पणे सजवून ठेवलेले असते. या संपूर्ण मांडणीला रुखवत म्हटले जाते. 

रुखवत हा विविध घर सजावटीच्या व वापरातील वस्तूंचा संग्रह आहे जो वधूच्या माहेर कडून वधूला दिला जातो. लग्न लागल्या नंतर हा पूर्ण रुखवत नवरी मुलगी आपल्या बरोबर सासरी घेवून जाते. 

रुखवत


रुखवत आला कुठून ?

रुखवतची परंपरा अगदी रामायण काळापासून आहे. कैकयी बरोबर तिच्या आवडत्या वस्तूं सोबत मंथरेला देखील सासरी पाठवण्यात आले होते, आयोध्येला. मुलीला सासरी पाठविताना , तिला भर-भरुन द्यायचे ही हजारो वर्षांची परंपरा आहे . या परंपरेने नंतर हुंड्याचे रूप घेतले. परंतु रुखवत म्हणजे हुंडा नव्हे. रुखवतला वेगळे महत्व आहे. रुखवत शब्दाची फोड केली तर अर्थ लक्षात येईल. रुखवत शब्द हा रुखसत व वतन या दोन शब्दांपासून बनलेला असावा. रूखसत म्हणजे विदाई,निरोप घेणे,दूर जाणे आणि वतन म्हणजे आपला देश, प्रदेश. लग्न झाल्यावर, मुलगी आपला देश सोडून, दूर देशी जाते. रुखसतच्या वेळी मुलीला,आपल्या वतनातील काही खास गोष्टी , तिच्या सोबत दिल्या जात म्हणून त्या खास वस्तूंना मिळून रुखवत शब्द प्रचलित झाला असावा. 

रुखवतचा उद्देश काय ? 

पूर्वी वाहतूकीची किंवा संपर्काची साधने आत्ता सारखी विकसित नव्हती.एकदा मुलगी लग्न होऊन सासरी गेली की ,मुलीचा,माहेर कडच्या नातेवाईकांशी संपर्क क्वचितच होत असे. आपली आठवण मुलीला राहवी या उद्देशाने , मुलीच्या मावश्या,आत्या,काकी,बहीणी व मैत्रिणी काही विशेष वस्तू आपल्या हाताने बनवून देत. यामध्ये जास्तीत जास्त हस्तकलेच्याच वस्तू असायच्या . भरतकाम , विणकाम केलेल्या वस्तू ,जसे बाहुल्या,रुमाल,तोरण,लटकन,झुंबर वगैरे.या वस्तूंशी मुलीचे भावनिक नाते जोडलेले असायचे. शिवाय नवरी मुलीच्या कला-गुणांचा दर्शक म्हणून रुखवत पाहायला जायचा. मुलीने आपल्या हाताने अनेक सजावटीच्या वस्तू बनवून रुखवतात मांडलेल्या असत. याशिवाय बारा महिने ठेवले तरी खराब न होणारे खाद्य पदार्थ जसे कुरडया,पापड्या,सांडगे,शेवया व त्या प्रदेशातील काही खास वस्तू  हमखास रुखवतात दिल्या जात. यांचे कारण असे की मुलीला एकदम तुटल्या सारखे वाटू नये.माहेराचे काही बंध रुखवताच्या निमित्ताने तिच्या सोबतीला काही काळ राहत.जसं-जसे हे पदार्थ संपत जातील , वस्तू जीर्ण होत जातील , तसं-तसे मुलीने सासराशी अधिक एकरूप व्हावे. हा या रुखवताचा उद्देश. 

रुखवताचे आजचे स्वरूप

आजच्या आधुनिक काळांत, मुलगी कितीही दूर असली तरीही आभासी संपर्कात असतेच. शिवाय कलाकुसरीच्या वस्तू बनविण्या करीता प्रत्येकाकडे वेळ शिल्लक राहत नाही. मुली आता विविध क्षेत्रात आपला छटा उमटवित आहेत. त्यामुळे रुखवताची प्रथा कमी झाली असली तरी नाहीशी झालेली नाही. थोडेसे स्वरुप बदलले आहे. आता रेडिमेड / तयार वस्तूंवर भर दिला जातो. कामाच्या वस्तूंवर जास्त भर दिला जातो. कायम स्वरुपी वापरतां येतील अशा गृहोपयोगी वस्तू , इलेक्टिक व इलेक्ट्रॅानिक साधने,संपूर्ण संसार ही दिला जातो. व केवळ प्रथा म्हणून पूर्वापार चालत आलेल्या रुखवतातील केवळ काही वस्तू ठेवल्या जातात. 

रुखवतातील पूर्वापार  वस्तू 

डोली


१)बैलगाडी २)डोली ३)सप्तपदी,सौभाग्य अलंकार व आईचा निरोप लिहिलेली कार्डशीटस् ४)तुळशी वृंदावन ५)सजविलेले कलश ६)सजविलेले पान-सुपारी ६)कृष्णाची हंडी ७)विणलेला ताटावरील रुमाल ८)विणलेले तोरण ९)विणलेला झूला १०)विणलेला आरसा ११)विणलेल्या बाहुल्या १२)विणलेला गणपती १३)सजविलेले घर १४)आईस्क्रीम काड्यांची होडी १५)रंगीत शेवया १६)झुंबर १७)लटकन १८)डिझायनर तोरण  १९)सनई-चौघडा २०)नवरा-नवरी २१)सुपारीचे भटजी २२) विहिण पंगत २३)गौरीहार २४)जातं २५)पाटा-वरवंटा २६)उखळ २७)भातुकली २८)फुलदाणी २७)फळे 

कलश


कोणत्याही रुखवतात सर्वसाधारण वरील वस्तू पाहायला मिळतात.वरील यादी पाहिजे तेवढी अजून वाढू शकते.कमी पण करता येते आपल्या हौसेनुसार. वरील बहुतेक वस्तू हस्तकलेच्या आहेत. या वस्तू बनविण्याइतपत वेळ आजकाल मुलींकडे नसतो. हि गरज ओळखून बाजारात वरील सर्व वस्तू तयार मिळतात.या वस्तूंची किंमत अगदी दहा-वीस रुपयां पासून सुरू होते. वरील यादीत वर्णन केलेला पूर्ण रुखवत तीन हजार रुपयांत मिळू शकतो, पण याचं सर्व यादी साठी पंधरा हजार रुपये सुद्धा कमी पडू शकतात. 

रुखवत किंमत 

वस्तूच्या क्वॅालिटीवर किंमत असते. कार्डबोर्ड पासून बनविलेली बैलगाडी शंभर रुपयांत मिळते पण जर ती आपण लाकडातील घेतली तर दोन ते पाच हजार मोजावे लागतील. पितळेची बैलगाडी १००० ते ८००० रुपयां पर्यंत मिळू शकते.

बैलगाडी


कलश पन्नास रुपये ते पंधराशे रुपयांना मिळतात. ताटावरील रुमाल ५० ते १००० रुपयांपर्यंत मिळतो. झुंबर २०० ते २००० रुपये. तोरण ६० ते ६०० रुपये.बाहुल्या ५० ते ५०० रुपये.  इतकी वेगवेगळी किंमत प्रत्येक वस्तूची आहे. यामुळे हा रुखवत दोन-तीन हजार पासून पुढे कितीही मोठ्या किमतीचा होऊ शकतो. परंतु रुखवत कमी किमतीच्या वस्तूंचा असला तरी दिसायला तो छानच असतो. फक्त वस्तू कागद,पुठ्ठा,प्लॅस्टिक व इतर स्वस्त कच्च्या मालाचा वापर करुन बनविलेल्या असल्याने त्या स्वस्त पडतात. त्यांच सेम वस्तू जर लाकूड,स्टील ,पितळ ,खडे,मोती यांचा वापर करुन बनविलेल्या असतील तर त्यांची किंमत जास्तच असणार.हौसेनुसार व बजेटनुसार रुखवत मांडला जातो. पण आजकालच्या मुलींना रुखवताची फारशी उपयोगीतता वाटत नाही त्यामुळे रुखवताविना देखील लग्नं साजरी होतात.

साखरेचा रुखवत 

साखरेचा रुखवत


वरील वस्तूं व्यतिरिक्त साखरे पासून बनविलेल्या काही वस्तू देखील शोभेसाठी मांडलेल्या असतात.या वस्तू नेहमीच्या दानेदार साखरे पासून किंवा साखर मिक्सर मध्ये बारिक करुन नंतर बनविल्या जातात. साखरेच्या या वस्तूंच्या संच ला साखरेचा रुखवत असे संबोधले जाते. यामध्ये गणपती , शंकराची पिंड ,कलश ,ताट,वाटी,तांब्या,फुलपात्र,तुळशी-वृंदावन,मिठाई अशा सर्वसाधारण वस्तू असतात. हे सर्व फक्त साखर वापरुन बनविले जाते. रासायनिक पदार्थ,रंग व गोंद यांचा वापर टाळला जातो.व्यवस्थित हाताळले , मेटेन केले तर हे पदार्थ शोभेची वस्तू म्हणून नंतर शोकेस मध्ये ठेवतां येतात. किंवा खाद्यपदार्थात वापरु शकतो.पण हे कसे,कोणी,कधी बनविले आहेत हे त्यापूर्वी जाणून घेणे जरूरी आहे.साखरेचा असा रुखवत तीनशे रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत मिळू शकतो.यांतील वस्तूंची संख्या,आकार,डिझाइन यांवर किंमत डिपेंड असते. 

साखरेचा रुखवत


असो ,वरील ब्लॅाग मध्ये आपण लग्नातील रुखवता संदर्भात भरपूर माहिती पाहिली आहे. याव्यतिरिक्त आपल्याकडे अजून काही माहिती उपलब्ध असल्यास ,जरुर लिहा खाली कॅामेंट मध्ये. जयहिंद ! जय महाराष्ट्र !!



टिप्पण्या