Modak mould : मोदक बनविण्याचे साचे

 मोदक बनविण्याचे साचे व बनविणे सोपे कसे  

जगभरात गणपतीस लाडवाचा नैवेद्य दाखविला जातो , महाराष्ट्रात मात्र नैवेद्य मोदकाचाच असतो.गणपती बाप्पांचे हे आवडते खाद्य व त्याच्या भक्तांचे देखील. उकडीचे मोदक जगप्रसिद्ध आहेत.इतर अनेक पदार्थांपासून देखील मोदक बनविले जातात. जसे साखर,गुळ,खवा,मावा,चॅाकलेट, बेसन वगैरे. तसे पाहिले तर पेढा व खव्याचा मोदक यांची चव सारखीच असते.चॅाकलेट व चॅाकलेट मोदक एकाच चवीचे असतात.पण याला जो आकार दिला जातो त्यामुळे त्याला आपण मोदक म्हणतो. हे मोदक एकसारखे दिसावेत व काम सोपे आणि लवकर व्हावे यासाठी मोदक साचांचा वापर केला जातो. हे साचे कसे आहेत व त्यांचा वापर याबद्दल जाणून घेऊ या.

चॅाकलेट मोदक साचे 

चॅाकलेट मोदक साचे

वरील साचे हे खास करुन चॅाकलेट चे मोदक बनविण्यासाठी वापरतात. हे एक जाड पारदर्शक प्लॅस्टिकचे शिट/पान आहे. एका पानावर सहा ते बारा मोदक चे आकार पाडलेले असतात.या साचांमध्ये दिड सेंटिमीटर ते दिड इंच एवढी खोली असणारे आकार मिळतात.मोठा आकार असेल तर एका पानावर कमी मोदक बसतात, लहान आकाराचे जास्त बसतात.  आवश्यक्तेनुसार लहान-मोठ्या आकाराचे मोदक बनविण्यासाठी हे साचे आपण वापरु शकतो. हे सर्वात स्वस्त देखील आहेत. २० ते ३० रुपयांत हे एक पान मिळते.आकार कोणताही असला तरी किंमत एकच असते. प्लॅस्टिकच्या या साचांचा उपयोग फक्त चॅाकलेट चे मोदक बनविण्यासाठी करता येतो. चॅाकलेट कंपाउंड विकत मिळते.हे कंपाउंड विशिष्ट पद्धतीने गरम करुन , त्यात आपल्या आवडीनुसार सुकामेवा किंवा इतर द्रव्ये एकत्र करुन तयार झालेली पेस्ट या साचांमध्ये ओततात.साचा डिपफ्रिजर मध्ये ठेवतात. काही वेळाने एकसारखे, सुंदर मोदक आपल्याला मिळतात.प्लॅस्टिक शीट थोडी उलटी-सुलटी करुन,शीट ला चिकटलेले मोदक काढतां येतात. (हा साचा वापरण्यापूर्वी एकदा चॅाकलेट कसे बनवायचे हे गुगल वर सर्च करा.)

सिलिकॅान मोदक साचे 

सिलिकॅान मोदक साचे

प्लॅस्टिकच्या मोदक साचांप्रमाणे, सिलिकॅानचे साचे देखील चॅाकलेटचे मोदक बनविण्यासाठी वापरतात. हे फुडग्रेड मटेरियलचे बनवलेले असल्याने,प्लॅस्टिक पेक्षा कधीही चांगले.सिलिकॅान मध्ये ही लहान-मोठे मोदक बनविता येतील असे वेग-वेगळे साचे मिळतात. सिलिकॅान मऊ व फ्लेक्झिबल असल्याने या साचांचा उपयोग करुन बनविलेले मोदक सहजी सांचातून काढतां येतात.सिलिकॅान फ्रिजर सेफ व मायक्रोवेव्ह सेफ असल्या कारणाने, सिलिकॅान मोदक मोल्ड चा वापर करुन,आपण मोदकच्या आकाराच्या कॅंडीज,कुकीज,बिस्किट व जेली देखील बनवू शकतो.यामध्ये खवा,मावा किंवा गुळाचे मोदक बनविता येतात. सिलिकॅान प्लॅस्टिक पेक्षा टिकायला,वापरायला व स्वच्छ करून ठेवण्यास उत्तम आहे. त्यामुळे किंमतही जास्त असते. सव्वाशे ते दोनशे रुपये एका सेट ची किंमत आहे.

प्लॅस्टिक मोदक साचे


वरील साचे हे जाड,मजबूत प्लॅस्टिक पासून बनविलेले मोदक साचे आहेत. यांना मोदक पट्टी बोलतात. एका पट्टीत ३ , ४, ५,,६  मोदक बनतील असे हे साचे आहेत. यांचा साइज नंबर ३ , २ , १ , ०  असा क्रमाने आहे. हे साचे खास करुन खवा , मावा , व गुळाचे मोदक बनविण्याकरीता वापरतात. मिठाईच्या दुकानांत मिळणारे मोदक अशा सांचातून बनवलेले असतात. या साचांमधून काम फारच सोपे व लवकर होते. यांचा वापर सहज करता येतो. मोदक पट्टी दुमडून , मोदकच्या साचात फक्त मटेरियल भरायचे , पट्टी उघडली की एकसारखे मोदक तयार असतात. 

मोदक बनविण्याची पद्धत 

मोदक बनविण्याची पद्धत

वरील फोटोतील मोदक पट्टी एक नंबर साइजची आहे. यांत एकावेळेस पाच मोदक बनवू शकतो. पावकिलो खव्यामध्ये साधारण २३-२४ मोदक होतात. सरासरी एक मोदक दहा ग्रॅमचा होतो.  किंमत साठ ते ऐंशी रुपये असू शकते. प्लॅस्टिकची क्वॅालिटी व कंपनीनुसार किंमत बदलते.

खवा मोदक


 मोठ्या  आकाराचे मोदक हवे असतील तर , २ नंबर साइज मध्ये थोडे मोठे मोदक तयार होतात. ही मोदक पट्टी चार मोदकांचीच असते. ३ नंबर पट्टीत यापेक्षा मोठे मोदक तयार होतात, पण तो तीनच मोदकांचा साचा असतो. यांच्या आकारानुसार व नंबर नुसार किंमत वाढत जाते.घरगुती वापरण्यासाठी प्लॅस्टिकचे हे साचे चांगले आहेत. 

ॲल्युमिनियम मोदक साचे

अधिक मजबूत, टिकाऊ साचे हे ॲल्युमिनियमचे मिळतात. यांचा आकार देखील प्लॅस्टिकच्या साचाप्रमाणेच आहे. किंमत मात्र दुप्पट ते तिप्पट असते.

उकडीचे मोदक 

उकडीचे मोदक

महाराष्ट्रातील  उकडीचे मोदक सर्वदूर प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रीयन गृहणी हे मोदक हातानेच बनवितात. पण सर्व मोदक अगदी एकसारखे दिसावेत यासाठी मोदक साचांचा वापर करता येऊ शकतो. हे साचे खालीलप्रकारचे असतात. 
उकडीच्या मोदक चा साचा

हा साचा प्लॅस्टिकच्या दोन किंवा तीन पाकळ्यांपासून बनलेला असतो. या पाकळ्या एका छोट्या नट ने एक-दुसरीला जोडलेल्या असतात. पाकळ्या जवळ घेतल्या की मोदकचा सुंदर आकार दिसतो व तळातील जागा उघडी असते. 

उकडीचे मोदक कसे बनवायचे 

उकडीचे मोदक बनविण्याचा साचा

उकडीचे मोदक बनविताना मोदक साचा बंद करुन एका हातात धरायचा. खाली मोकळी जागा असते. तांदळाच्या उकडचा एक छोटा गोळा यांत भरायचा. हा गोळा सर्व बाजूंवर दाबून साचाच्या ,या आतील बाजूंवर चिकटला जाईल असे पहावे. उकड सर्व बाजूवर चिकटली की मध्ये पुन्हा मोकळी जागा तयार होईल. या मधल्या पोकळीत मोदकाचे सारण भरावे. मोदकाचा तळ बंद करण्यासाठी पिठीचा एक पॅच लावून हा तळ बंद करावा. (पिठीची छोटीसी गोळी करुन सारण वर थोडी दाबून एकसारखे करावे) एक-दोन मोदक करेपर्यंत थोडेसे अवघड वाटते परंतु एकदा लक्षात आले की फटाफट मोदक तयार होतात. सर्व एकसारखे मोदक दिसायला सुंदर दिसतात. 
प्लॅस्टिकच्या या मोदक साचांमध्ये लहान-मोठे साइज मिळतात. उकडीचे मोदक बनविण्यासाठी मध्यम आकारच सोयीस्कर पडतो. दोन-अडीच इंच उंचीचा. प्लॅस्टिकचे हे साचे वीस रुपयांपासून मिळतात. ॲल्युमिनियम मध्ये देखील असे साचे उपलब्ध आहेत. अर्थातच ते तिप्पट किमतीला मिळतात. 
साखरेचा मोदक


टिप : मोदक बनविताना काही वेळेस साच्यांच्या आतील बाजूस तेल किंवा तूपाचे हल्के बोट लावावे लागते, म्हणजे मोदक सहजी निघून येतात. तुटत नाहीत.  
सर्व मोदक साचे हे ॲानलाइन व ॲाफलाइन महाराष्ट्रातील बहुतेक सर्व मार्केट मध्ये मिळतात. येथे सर्वांची सरासरी एका नगाची किंमत दिलेली आहे. काही ठिकाणी थोड्या कमी किंवा जास्त किंमतीला हे साचे मिळू शकतात. 
हा ब्लॅाग आवडला असल्यास आपल्या paisevasool18 ब्लॉग ला फ़ॉलो करा. 


टिप्पण्या