Indoor water fountain : गृहसजावटीसाठी पाण्याचे तयार कारंजे

 Indoor water fountain  
गृहसजावटीसाठी पाण्याचे तयार कारंजे

आपले घर छोटे असो वा मोठे ,प्रत्येकजण आपले घर नीट-नेटके व आकर्षक ठेवण्याच्या प्रयत्नात असतो.स्वच्छ,सुंदर,सजविलेले घर पाहुण्यांना भुरळ पाडते.नेटकेपणाने मांडलेला संसार घरात उल्हासाचे वातावरण निर्माण करीत असतो.घराची मांडणी व्यवस्थित दिसावी यासाठी आपण अनेक सजावटीच्या वस्तूंची घरात वाढ करीत असतो.या सर्व वस्तू निर्जीव असतात.थोड्याच काळानंतर आपणांस ती वस्तू कालबाह्य वाटू लागते.पुन्हा आपण नवीन काहीतरी शोधत राहतो. या नवीन वस्तूंमधील एक म्हणजे गृहसजावटीसाठी पाण्याचे तयार कारंजे.

गृहसजावटीसाठी पाण्याचे कारंजे


पुरातन काळापासून वाडे-राजवाडे यांची शोभा वाढविण्याकरीता पाण्याची मोठ-मोठे कारंजे वाड्यांसमोर उभारली जातं.पण आता ना वाडे राहिले ना ते कारंजे.चार भिंतींच्या आत माणसांचे आयुष्य बांधले गेले.माणसांनी त्यांना आवडणाऱ्या वस्तू देखील बांधून चार भिंतीच्या आत आणल्या. त्यातील एक वस्तू म्हणजे चार भिंतींच्या आत वापरु शकणारं पाण्याचं कारंजे.

गृहसजावटीसाठी पाण्याचे कारंजे



 पाण्याचे कारंजे का ठेवायचे ?


पाणी म्हणजे जीवन. वाहते पाणी हे जिवंतपणाचे लक्षण आहे. घरातील कारंजे ही एक शोभेची वस्तू असली तरी त्यातील वाहत्या पाण्यामुळे हे कारंजे इतर शोभेच्या वस्तूंप्रमाणे निर्जीव भासत नाही.यातून खळाळणारे पाणी,पाण्याचा खळखळाट,उघड-बंद होणारे रंगीत दिवे व पाण्यावर गिरक्या घेणारा काचेचा बॅाल हे सर्व या कारंज्याला जिवंतपणा देत असतात. असे कारंजे मन प्रसन्न ठेऊन कार्य करण्यासाठी उर्जा प्रदान करते त्यामुळे ॲाफिसेस मध्ये देखील पाण्याचे कारंजे ठेवले जाते.

गृहसजावटीसाठी पाण्याचे कारंजे

कारंजे ठेवण्याचे शास्त्रीय कारण 

वाहते पाणी हे निगेटिव आयन निर्मितीच्या क्रियेत सक्रीय असते असे म्हणतात.निगेटिव आयन धूर,धूळीकणांना आकर्षित करतात. यामुळे कारंजे वातावरणातील प्रदूषण कमी करण्याचे काम करते असे मानले जाते.कारंजे जेवढे मोठे असेल तेवढा अधिक याचा प्रभाव जाणवेल.तसेच मोठे कारंजे आपल्या आजूबाजूस मोठ्या प्रमाणांत पाण्याचा शिडकाव करत असते.उन्हाळयात पाण्याचा हा शिडकाव थंडावा देतो.हिवाळयात कारंज्याच्या आसपासच्या हवेतील दमटपणा वाढून वातावरण अधिक आल्हाददायक होते.

गृहसजावटीसाठी पाण्याचे कारंजे


कारंज्यामागील वास्तुशास्त्र 

खळाळते पाणी हे ,खळाळता पैसा,प्रेम व आनंदाचे प्रतीक मानले जाते.यामुळे पॅाजिटिव उर्जा निर्माण होऊन , सौभाग्य वृद्धींगत होते असे मानले जाते.कारंज्यामध्ये पाण्याचा सतत ओघ वाहत असतो त्याप्रमाणे आपल्या कामाचा वेग ही वाहतां राहतो.त्यामुळे पैशाचाही ओघ घरात वाहतां राहतो असे मानले जाते.

गृहसजावटीसाठी पाण्याचे कारंजे

वर दर्शविलेली सर्व कारंजे तयार विकत मिळतात.हे फक्त लक्षात येण्यासाठी काही डिझाइन येथे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे परंतु प्रत्यक्षात शेकडोंनी डिझाइन उपलब्ध आहेत.देवी-देवतांच्या,प्राण्यांच्या,फुलांच्या व ॲंटिक डिझाइनच्या कारंज्यांची भरपूर व्हरायटी आपल्याला पाहायला मिळतात.

घरातील कारंजे कशी बनलेली असतात 

हे कारंजे फायबर,प्लॅस्टिक किंवा फायबर ग्लास पासून बनविलेले असतात.एका किंवा अनेक साचांचा उपयोग करून कारंज्याला आकर्षक बाह्य रुप दिले जाते.फायबर ग्लास मुळे ते भरीव व जड वाटतात परंतु प्रत्यक्षात आतून हे पोकळ व वजनाला हलके असतात.चमकदार,वॅाटरप्रूफ रंगांमुळे यांचे सौंदर्य खुलून दिसते.

 वर दाखवलेले सर्व कारंजे सहा-सात इंच रूंदी व दहा-बारा इंच उंचीचे आहेत. प्रत्यक्षात यापेक्षा थोडे लहान व खूप मोठी कारंजे मिळतात.


Inside of water fountain


हे सर्व कारंजे आतून पोकळ असतात.पुरेसे पाणी राहिल एवढी जागा या पोकळीत असते. या पोकळीत पाण्याची छोटी मोटार ठेवलेली असते.मोटरला जोडलेल्या छोट्या पाइपचे एक टोक आतूनच कारंजेच्या वरच्या टोकापर्यंत पोहोचलेले असते.जेव्हा कारंज्याच्या पोटात आपण पाणी भरुन मशीन चालू करतो,पाइप मधून पाणी कारंज्याच्या वरच्या बाजूला पोहचते.कारंज्यातून पाण्याचा धबधबा वाहताना दिसतो.खाली पडणारे पाणी पुन्हा कारंज्याच्या पोटात जमा होत असते व मोटार मुळे पुन्हा-पुन्हा तेच पाणी कारंज्यामधून फिरविले जाते.एकदा एक-दोन ग्लास पाणी या कारंज्यात भरुन टाकले की २४ तास बघायची गरज पडत नाही जरी कारंजे सतत चालू असले तरी.

गृहसजावटीच्या कारंज्याची किंमत 

या कारंज्यांचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे त्याची मोटार किंवा पंप किंवा मशीन, काही म्हणा.

Water fountain machine

या प्रकारचे पंप ३००/- ते ७००/- रुपयां पर्यंत मिळतात.क्वॅालिटी / कंपनी नुसार किंमत बदलते.३००/- चा पंप देखील भरपूर टिकू शकतो.हि मशीन विकत घेऊन आपण पाहिजे तसे कारंजे बनवू शकतो.जर तयार कारंजेच घ्यायचे असेल तर बहुसंख्य कारंजे एक ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. बहुतेक सर्वांमधील पंप साधारण क्वॅालिटीचा व एकसारखाच असतो. फक्त कारंज्याचे बाह्यरुप,आकार व डिझाइन नुसार किंमतीत फरक पडतो.ॲानलाइन व ॲाफलाइन किमतीत फारसा फरक पडत नाही.मेट्रो सिटीज मध्ये मात्र ॲाफलाइन थोड्या कमी किमतीत मिळणे शक्य असते.

सजावटीच्या कारंज्याची निगा 

कोणतेही कारंजे कोठूनही खरेदी केले तरी त्यांना गॅरंटी / वॅारंटी नसते.त्यामुळे यांना काळजीपूर्वकच हाताळावे लागते.हे पडले, हातातून निसटले की फुटणार नक्की, किंवा गळणार. यांना बारीक छिद्र असेल तर एम-सील सारखे अडेजीव लावून ते बुजवतां येऊ शकते. जर फुटले तर नवीन काही डिझाइन आपण घरात बनवू शकतो,जर याचा पंप शाबूत असेल तर. पंप शाबूत ठेवायचा असेल तर याचा नियमित वापर करावा लागेल.सणा-सुदिला चार दिवस वापरुन नंतर हे कारंजे पॅक करुन ठेवले व परत चार-सहा महिन्याने वापरायला काढले तर, ते बंद पडलेले असू शकते.यापेक्षा हे कारंजे नियमित वापरणे केव्हा ही उत्तम ! काही वस्तू ह्या वापरुन खराब होतात तर काही न वापरल्यामुळे खराब होतात. तर हा पंप दुसऱ्या प्रकारात मोडतो जो न वापरण्याने खराब होऊ शकतो.त्यामुळे हे कारंजे दरोरजच चालू ठेवून वापरणे कधीही चांगले.नियमित वापर केला तर या पंप चे आयुष्य दीड ते तीन वर्षांचे आहे.खराब झाल्यावर तो पंप दुरुस्त करण्यापेक्षा नवीन घ्यावा कारण रिपेयर केल्यावर तो पुढे सहा महिने तरी चालेल याची गॅरंटी नाही व पैसे मात्र खर्च होतील दीड-दोनशे,व नवीन पंप येतो तीनशे मध्ये,जो पुढे दीड ते तीन वर्षे चालेल. कारंजे जर आपण सतत वापरले तरी महिनाभर लाइटबील काही जास्त वाढणार नाही.एक ट्युब साठी जेवढे युनिट लागतात तेवढेच यासाठी खर्च होणारं आहेत.

कारंजे चालू असताना त्याच्या पाण्याचा शिडकाव आजूबाजूला होत असतो.त्यासाठी पाण्याच्या संपर्कात खराब होणारी कोणतीही वस्तू कारंजाच्या आसपास ठेऊ नये. पाणी असे आजूबाजूस उडून पाण्याचे डाग वस्तूंवर येतात त्यामुळे काळजी घ्यावी. तसेच कारंजातील पाणी या कारणाने कमी होत राहते.दररोज कारंजात पाणी वाढवावे लागते. कारंजातील पाणी वाहते असते,त्यामुळे यांत डासांची उत्पत्ती होण्याची व पाण्याचा वास येण्याची शक्यता कमी असते परंतु जर हे कारंजे रेग्युलर साफ केले नाही तर आतील पृष्ठभागावर एक चिकटसा थर जमा होऊ शकतो. तसेच तळाला गाळसदृश थर जमा होतो.८-१५ दिवसांनी कारंजातील पाणी पूर्ण काढून,ओतून ते नेहेमीच्या साबणाने/पावडर ने स्वच्छ धुवून घ्यावे.काही वेळेसाठी स्वच्छ कोरडे ठेवावे व नंतर पुन्हा स्वच्छ पाणी भरुन वापरावे.साफ करण्यासाठी कोणतेही ब्लीच किंवा केमिकल वापरु नये. यांचा परिणाम बाहेरच्या डिझाईनवर होतो व रंगरंगोटी फिक्की पडते. 

असो , या लेखांत आपण इनडोअर वॅाटर फाऊंटन बाबत बरीच माहिती घेतली आहे. असेच माहितीपूर्ण लेख वाचण्यांकरिता आपल्या paisevasool18 ब्लॅाग ला फॅालो करा. 

जयहिंद ! जय महाराष्ट्र !!

टिप्पण्या