- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Cold water bottle
थंड पाण्यासाठी बाटल्या
उन्हाळा सुरू झाला की आपल्याला थंड पाण्यासाठी एका चांगल्या बाटली ची गरज जाणवते. कारण उन्हा-तानात फिरत असताना , थंड पाण्याचे दोन घोट अमृतासमान वाटतात. पण घराबाहेर असताना, तहानेच्या वेळी आपल्याला पाणी वेळेला मिळेल याची शाश्वती नसते तर थंड पाणी कुठून मिळणार ? अशा वेळी थंड पाण्याच्या बाटलीची आठवण होते. मग आपण बाजारातून कोणती तरी बाटली विकत घेतो, जी आपली थंड पाण्याची गरज भागवेल की नाही याबद्दल साशंकता असते.
तरी थंड पाण्यासाठी बाजारात उपलब्ध असणाऱ्या काही बाटल्यां विषयी आज आपण जाणून घेऊ या.थंड पाण्यासाठी शेकडोंनी बाटल्या उपलब्ध आहेत. पण सर्वच बाटल्यांमध्ये पुरेसा वेळ पाणी थंड राहिल याबद्दल निश्चितच सांगू शकत नाही.
मातीची बाटली
पाणी थंड राहण्यासाठी सगळ्यांत सोपा व साधा उपाय म्हणजे मातीचा माठ. माठातील पाणी बाहेरील वातावरणा पेक्षा थंड असते, व ते तसेच बराच काळ थंड राहू शकते. याचाच विचार करुन मातीच्या बाटलीची निर्मिती करण्यात आली आहे. ही बाटली टेराकोटा माती पासून बनविली जाते.दिवाळीच्या पणत्यां देखील याचं मातीच्या असतात. ही माती वस्तूंना थोडी जास्त मजबूती देते.
मातीच्या बाटलीचा फायदा
जे लाल मातीचे माठ असतात,त्यांच लाल मातीला, बाटलीचा आकार दिलेला आहे. या बाटलीचे तोंड मात्र प्लॅस्टीकचे आहे. साधारणत: एक लीटर पर्यंत पाणी यांत राहू शकते. या बाटलीत ठेवलेले
पाणी संपूर्ण दिवसभर थंड राहते. बाहेरील तापमान कितीही उष्ण असले तरी आपण थंड पाण्याचा आस्वाद घेऊ शकतो. पाण्याची चव देखील चांगली राहते. मातीचा नैसर्गिक वास काही दिवस पाण्याला आला तरी तो सुसह्य असतो. नकोसा वाटत नाही. थंड पाण्याचा आस्वाद जर दिवसभर घ्यायच्या असेल तर मातीची बाटली सर्वोत्तम आहे. इकोफ्रेंडली देखील आहे. ना आपल्याला काही नुकसान ना पर्यावरणाला.
मातीच्या बाटलीची काळजी
मातीची बाटली वापरताना मात्र थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. कारण मातीच्या इतर कोणत्याही भांड्यांप्रमाणे,ही बाटली पडली की फुटणार आहे. साफ - सफाई करताना काळजी पूर्वक हाताळणे जरूर आहे नाहीतर चीरा जावू शकतात व पाणी ठिबकू शकते. डिझाइन नुसार या बाटल्यांचे वजन तिनशे ते सहाशे ग्रॅम असते. त्यात पाणी भरल्यावर साधारणत: दिड किलो वजन आपल्याला रोज वागवावे लागणार आह. हेळसांडच होणारं असेल तर बाटली फुटण्याची शक्यता आहे. शिवाय ही बाटली मातीची असल्यामुळे यातून पाणी काही अंशी पाझरत असते , आपल्या बॅगेतील साहित्य ओले होऊ शकते. यामुळे ही बाटली रोज ने-आणे करण्यासाठी काळजीपूर्वक वापरावी लागणार आहे. अशी बाटली कुंभारांकडे दीडशे ते दोनशे रूपयांत मिळते तर ॲानलाइन व ॲाफलाइन दुकांनांत तीनशे ते सहाशे रूपयांत मिळते. मातीच्या बाटली ची विशेषत: हीच आहे की यामध्ये साधारण तापमानाचे पाणी थोड्याच वेळात थंड होते .
मातीची बाटली वगळता इतर सर्व प्रकारच्या थंड पाण्याच्या बाटल्या , थंड पाणी असेल तरच ते पाणी जास्त वेळ पर्यंत थंड ठेवण्याचे काम करतात. कोणतीही बाटली स्वत:हून पाणी थंड करण्याचे काम करीत नाही, मातीच्या बाटली प्रमाणे.थंड पाण्यासाठी प्लॅस्टीक,स्टील,ॲल्युमिनियम वगैरेच्या बाटल्या उपलब्ध आहेत.
थंड पाण्याची प्लॅस्टिक बाटली
पाणी थंड ठेवण्यासाठी प्लॅस्टीक बाटली हा सर्वात स्वस्त उपाय आहे. दोनशे मिलीलीटर ते दोन लीटर पाणी राहू शकेल एवढ्या विविध आकारांत या बाटल्या उपलब्ध आहेत. पन्नास रुपये ते पाचशे रुपये पर्यंत यांच्या किमती आहेत. दोन तास ते दहा तास यामध्ये पाणी थंड राहू शकते.
थंड पाण्याच्या प्लॅस्टीक बाटलीचे फायदे
प्लॅस्टीक बाटल्यांची किंमत कमी असते. तुटण्या-फुटण्याची शक्यता कमी असते. हाताळण्यास सोप्या असतात.वजनाने हलक्या असतात. दिवसभर आपल्या सोबत वागवणे शक्य होते. पुरेसा वेळ पाणी थंड ठेवतात. बाटली ब्रश व साबणाने सहजी स्वच्छ करता येते. पण या सर्व गोष्टी सर्वच बाटल्यांच्या बाबतींत लागू होतात असे नाही. प्लस्टीक बाटली घेताना शक्यतोवर मिल्टन,सेलो किंवा इतर चांगल्या कंपनीची घ्यावी. कंपनीची बाटली असेल तर त्याची प्लॅस्टीकची क्वॅालीटी थोडी चांगली असते. शक्यतोवर फुडग्रेड प्लॅस्टीक वापरले जाते . प्लॅस्टीक ची मजबूती अधिक चांगली असते .चमकदार असते . अशा बाटल्या दोन प्लॅस्टीक थर जोडून बनविलेल्या असतात. बाहेरच्या तापमानाचा बाटली मधील पाण्यावर परिणाम होऊ नये म्हणून प्लॅस्टीक च्या दोन थरांमध्ये उष्णतारोधक मटेरियल भरलेले असते. त्यामुळे पाणी अधिक वेळ थंड राहते.
फार स्वस्त मिळणाऱ्या बाटल्यांमध्ये असे काही केलेले नसते. त्यामुळे या बाटल्यां मधील पाणी दोन तासांपेक्षा जास्तवेळ थंड राहत नाही. शिवाय यांच्या प्लॅस्टीक ची क्वॅालीटी आतून-बाहेरुन हल्की असते. त्यामुळे अगदी थोड्याच दिवसांत या बाटल्या फारच जुनाट दिसू लागतात. शिवाय पाण्याला प्लॅस्टीकचा वास येत राहतो. यासाठी सुरूवातीला ब्रॅंडेड बॅाटल महाग वाटत असल्या तरी त्यांच घ्यावयास हरकत नाही कारण वापरण्याचे समाधान मिळते व पैसे वसूल होईपर्यंत त्या टिकू शकतात.
लहान मुलांसाठी प्लॅस्टीक बॅाटल
लहान मुला-मुलींसाठी उपलब्ध असणाऱ्या थंड पाण्याच्या बाटल्यांची किंमत कंपनी व डिझाइन वर असते. छोट्या- मोठ्या आकारावरून ठरत नाही. आकारावरून किमतीत फारसा फरक नसतो. थंड पाण्याची बाटली घेताना डिझाइन किंवा आकार याचा विचार करण्या ऐवजी फक्त क्वॅालिटीचाच विचार करावा. लहान मुलांची शाळा मुळातच कमी वेळ असते. त्यातही मुले शाळेत असताना फारच कमी पाणी पितात.यासाठी लहान मुलांसाठी छोटी पण चांगल्या कंपनीची बाटली घ्यावी की जी फुडग्रेड व वास न येणारे प्लास्टीक वापरुन बनविलेली असेल. छोटी बाटली असेल तर दप्तराचे वजनही जास्त होत नाही परंतु बरेचदा फक्त स्वस्त आहे म्हणून पालक उगीचच मोठी बाटली घेतात.
प्लॅस्टीक बाटलीत पाणी किती वेळ थंड राहते ?
कंपनी, क्वॅालिटी,किंमत यानुसार प्लॅस्टिक बॅाटल मध्ये दोन ते दहा तास पाणी थंड राहू शकते. कोणत्याही बाटलीत पाणी थंड आपोआप होत नाही , जेवढे जास्त थंड पाणी आपण बाटलीत भरुन ठेऊ तेवढे अधिक वेळ पाणी थंड राहू शकते. सामान्यांच्या माहितीच्या व परवडणाऱ्या किंमतीत असणाऱ्या बॅाटल चा विचार केला तर मिल्टन व सेलो या कंपनीच्या बॅाटल चा विचार करता येईल. मिल्टन व सेलो ची एक लीटर इंन्शुलेटेड बॅाटल दीडशे ते पाऊणेदोनशे पर्यंत मिळते. या बाटलीत पाणी दहा तास थंड राहू शकते परंतु त्यासाठी अट आहे. बाटली थंड पाण्याने पूर्ण भरायची व झाकण लावून तशीच सावलीत ठेवायची,दहा तासांनंतर पाणी थंडच मिळेल. पण बॅाटल आपण यासाठी घेत नसतो , आपण ती वापरणार असतो,अशा स्थितीत पाणी पाच तास थंड राहते. तसे पाहायला गेले तर दहा ते सहा या आठ तासांच्या वेळांत,जेव्हा रखरखीत उन असते,तेव्हा आपल्याला थंड पाण्याची गरज असते. एवढ्या वेळांत हे पाणी पूर्ण थंड राहीलच याची शाश्वती नाही परंतु हे देखील खरे आहे की पाणी गरम होत नाही,साध्या प्लॅस्टीक बाटली प्रमाणे. पाणी जास्त वेळ थंड राहवे,असे वाटत असेल तर बाटली कमीतकमी वेळा उघड-बंद करावी म्हणजे बाहेरील गरम हवा बाटलीत जाणार नाही व आतील पाण्याचे तापमान वाढविणार नाही. ब्रॅंडेड बाटल्यांची हि अवस्था तर लोकल स्वस्त बाटल्यांकडून काय अपेक्षा करायची ? म्हणून स्वस्त साध्या बाटल्या घेतल्या तर पैसे वाचवले गेल्यासारखे वाटते. पण नंतर लक्षात येते की पैसे वाया गेले कारण यांत दोन तास देखील पाणी गार रहात नाही.
आणि पैसे खर्च करायचे नसतील तर सर्वात सोपा उपाय आहे . कोणत्याही प्लॅस्टीक बाटलीला एक ओला नॅपकिन व्यवस्थित गुंडाळून ठेवणे व तासा-दोन तासाने तो नॅपकिन पाणी शिंपडून ओलाच ठेवणे. या बाटलीतील पाणी संपूर्ण दिवसभर थंडच राहणार.
प्लॅस्टीक बॅाटल वापरण्याने नुकसान
हलक्या प्लॅस्टीक च्या बॅाटल मध्ये पाणी जास्त वेळ ठेवल्यास पाण्याला विचित्र वास येतो. बाटली दिर्घकाळ आतून साफ न करता वापरल्यास बाटली च्या आत एक प्रकारचा थर जमा होतो , ज्यामध्ये हानिकारक जीवाणूंचे-विषाणूंचे अंश असू शकतात.
कोणतीही प्लॅस्टीक थंड पाण्याची बाटली एक वर्षापेक्षा जास्त काळ वापरू नये. प्लॅस्टीक वर साधारण वातावरणाचा देखील परिणाम होतो. आपल्या मोबाईल कव्हर वरून हे लक्षात येते, एक महिन्याच्या आत मोबाईल कव्हर पिवळे पडते. कारण प्लॅस्टीक मधून विशिष्ट केमिकल रिलीज होत असतात. प्लॅस्टीक बाटली दिर्घकाळ वापरल्यास हे केमिकल जास्त प्रमाणात रिलीज होत राहतात . हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात.
पाण्यासाठी धातूंच्या बॅाटल
ॲल्युमिनियम किंवा तांब्याच्या बाटलीत पाणी थंड राहत नाही. मिल्टन कंपनीची देखील तांब्याची बाटली असेल तरी त्यात पाणी थंड राहत नाही. फक्त स्टील च्या बाटली मध्ये पाणी थंड राहू शकते. ते देखील सर्वच स्टील बाटल्यांमध्ये पाणी थंड राहत नाही. डबल वॅाल स्टेनलेस स्टील बाटलीतच पाणी थंड राहू शकते.
थंड पाण्यासाठी स्टील ची बाटली
पाणी थंड राहणारी स्टील ची बाटली ही स्टील च्या दोन लेयर पासून बनविलेली असते. दोन लेयर मध्ये निर्वात पोकळी असते. थोडक्यात सांगायचे तर स्टील च्या एका बाटलीच्या आत , तशीच पण थोडीशी छोटी बॅाटल ठेवून , दोन्हीपासून एक अखंड बाटली बनविली जाते. दोन बाटल्यांच्या मध्ये जी निर्वात पोकळ जागा असते त्यामुळे बाहेरील तापमानाचा, बाटलीच्या आतील पाण्याशी थेट संपर्क येत नाही. यामुळे अशा बाटलीतील पाणी जास्त वेळ थंड राहते.
स्टील बाटलीत पाणी किती वेळ थंड राहते ?
स्टील डबल वॅाल बाटलीत पाणी चोवीस तासांपर्यंत थंड राहू शकते.यामध्ये पाणी आपोआप थंड होत नाही. यामध्ये थंड पाणी भरुन ठेवले तरच ते थंड राहते. बाटली पाण्याने भरुन फ्रिज मध्ये ठेवली तरी पाणी थंड होणारं नाही. मिल्टन किंवा सेलो सारख्या कंपनीच्या बाटलीत पाणी चोवीस तास थंड राहू शकते. पण अट अशी की बाटली थंड पाण्याने संपूर्ण भरुन सावलीत ठेवायची व चोवीस तासांनी उघडल्या नंतर पाणी थंडच मिळेल. पण आपण बाटली रोज बाहेरील वातावरणात वापरणार असतो. अशावेळी यांतील पाणी आठ तासांपर्यंत थंड राहू शकते. आठ तास पुरेसा वेळ आहे.कारण दिवसाच आपल्याला थंड पाण्याची जास्त आवश्यक्ता भासते. सकाळी दहा ते संध्याकाळी सहा. बाटली आपण जेवढे कमीवेळा उघड-बंद करु तेवढा जास्त वेळ बाटलीतील पाणी थंड राहील.
आकार व किंमत
तीनशे एम एल पासून दोन लीटर आकाराच्या स्टीलच्या गार पाण्याच्या बाटल्या मिळतात. यांची किंमत तीनशेपासून दोन हजार रुपयांपर्यंत आहे. याचा अर्थ असा नाही की एम एल प्रमाणे रुपये आहेत. बाटलीचे वजन व डिझाइन यानुसार किंमत बदलते. मिल्टन,सेलो,सिग्नोरावेअर,ॲटलास वैगेरे स्टॅंडर्ड कंपनीच्या एक लीटर , प्लेन स्टील डबल वॅाल बॅाटल, हजार रुपये च्या आसपास मिळतात.पण याचं कंपन्यांच्या अशाच डिझायनर बॅाटल , एक लीटर पेक्षा कमी साइज च्या येतात परंतु किंमत हजार रुपयांपेक्षा जास्त असू शकते तर डिझायनर अर्धालीटर बाटली सात-आठशे रुपयांपर्यंत मिळते. प्लेन स्टील गार पाण्याची दीड लीटर बाटली बाराशे रुपयांत तर दोनलीटर दीड हजारात मिळू शकते.परंतु किंमत स्वस्त आहे म्हणून मोठी बाटली घेवू नये.कारण या बाटल्यांचे वजन थोडे जास्त असते. अर्धा किलो पेक्षा जास्त. पाणी भरल्यानंतर त्या अधिक जड होतात. शिवाय पाणी दिवसभरात संपणार आहे काय? पाणी जसे संपत जाईल , तसे त्याचे तापमान वाढत जाते.दहा तासांत ते रुम टेंपरेचरला येते. चोवीस तास ते वापरू शकत नाही. यामुळे आपल्याला जेवढ्या पाण्याची जरुरी आहे तेवढीच साइज घ्यावी.
स्टील बाटलीचा फायदा
या बाटल्या शक्यतोवर फुडग्रेड , स्टेनलेस स्टील पासून बनविलेल्या असतात. मेटल असल्यामुळे तुट-फूट होण्याची शक्यता फारच कमी आहे. स्टील असल्याने गंजत नाही किंवा पाण्यांत हानिकारक रसायने तयार होत नाही. टिकायला उत्तम आहेत. आपण दिर्घकाळ वापरू शकतो. साफ करण्यास फारच सोप्या आहेत. साध्या साबण,पाण्याने,घासणीने घासू शकतो. पण घासणी मुळे स्क्रेचेस येऊ शकतात.
स्टील बाटलीमुळे नुकसान
सगळ्यात मोठे नुकसान हे आहे की , ही बॅाटल केवळ लहान मुलेच नाही , तर मोठ्या माणसांकडून ही हरवून जाते. कोठेतरी विसरली जाते. जी परत मिळत नाही. किंवा यांचे झाकण हरविले तर ते परत विकत मिळणे देखील सहज शक्य नसते.
या बाटल्यांच्या झाकणावर एक छोटीशी रबर रींग असते ही जर हरविली किंवा तुटली तर बाटलीतले पाणी थंड राहत नाही.
बाटली योग्य,काळजीपूर्वक न वापरल्या मुळे,बाटलीस कोचे येतात. बाटली बेंड होऊ शकते. बाटलीच्या आतील निर्वात पोकळीत बाहेरील हवा जमा होऊ लागते. हे आपल्या डोळ्यांना दिसत नाही पण यामुळे पाणी फारच कमी वेळ थंड राहते. दिर्घकाळ बाटली वापरल्यावर देखील असे होऊ शकते.
कोणतीही बाटली आपण चोवीस तास गार पाणी मिळण्यास वापरू शकत नाही. बाटली दिवसभरात आपण दहावेळा उघडणार,गार पाणी पिण्याकरीता, प्रत्येक वेळी बाहेरील उष्ण हवा बाटलीत प्रवेश करणार व बाटलीतील पाण्याचे तापमान वाढविणार. साधारणत: दहा तासातच पाणी साधारण तापमानाला येते. बाटलीतील पाणी गरम होत नाही हाच एक फायदा.
यालेखांत आपण बाजारात सहजी उपलब्ध असणाऱ्या गार पाण्याच्या बाटल्यां विषयी पूर्ण माहिती पाहिली आहे. हा लेख आवडला असल्यास आपल्या पैसा वसूल मराठी ब्लॅागला फॅालो करा म्हणजे अशाच कामाच्या वस्तुंविषयी आपल्याला वेळच्या-वेळी माहिती मिळत राहिल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
या ब्लॅाग मध्ये संपूर्ण अभ्यासपूर्वक लेख लिहिलेले आहेत की ज्यामुळे कोणत्याही वस्तू विषयी विश्वासार्ह माहिती उपलब्ध होईल,तरीही काही कमतरता जरुर राहू शकतात. कृपया आपल्या सूचना व मार्गदर्शन स्वागतार्ह आहे. आपले विचार जरुर नोंदवा व ब्लॅागला फॅालो करा. जयहिंद ! जय महाराष्ट्र !!